उदगिरी साखर कारखान्याचे सहा लाख ३८ हजार टन गाळप : संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम

सांगली : यावर्षी पाऊसमान फारच कमी असतानाही उदगिरी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाच्या १४१ दिवसांत ६ लाख ३७ हजार ८१६ टन उसाचे गाळप केल्याची माहिती उदगिरी कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांनी दिली.

बामणी-पारे (ता. खानापूर) येथील उदगिरी साखर कारखान्याच्या अकराव्या गळीत हंगामाची सांगता माजी आमदार मोहनराव कदम व संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते गव्हाणीची पूजा करून करण्यात आली. यावेळी संचालक प्रल्हाद पाटील, पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील, जयसिंगराव कदम, आबासाहेब चव्हाण, जे.के. जाधव, मधुनाना भोसले उपस्थित होते.

शिवाजीराव कदम म्हणाले, या हंगामासाठी ऊसतोडणी मजूर कमी उपलब्ध झाले. त्यामुळे पुढील हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊसतोडणी यंत्रणेवर भर द्यावा. संचालक उत्तम पाटील म्हणाले, संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांच्या नेतृत्वाखाली व अध्यक्ष डॉ. राहुल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उदगिरी साखर कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे.

यावेळी मोहनराव कदम यांच्या हस्ते ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदार व हंगामी कामांचे कंत्राटदार यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मुकुंद बोधनकर, शास्त्रज्ञ गोकरे, सरपंच आनंदराव शेळके, उपसरपंच अभिजित शिंदे, सुरेश पाटील, भरत लेंगरे, महावीर शिंदे, प्रशासकीय अधिकारी बशीर संदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. संचालक प्रल्हाद पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here