सातारा : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणावर साखर कारखानदारांचाच वरचष्मा असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघांत साखरसम्राट जिंकले आहेत. या सहा आमदारांपैकी कोणी कारखान्याचे अध्यक्ष, तर कोणी संचालक आहेत. यापूर्वीही अनेक कारखानदारांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सहज जिंकल्या आहेत. पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता भाजपने या क्षेत्राचा राजकारणासाठी पुरेपूर उपयोग केला. साखर कारखान्यांवर वरचष्मा असणाऱ्या नेत्यांना सर्वपक्षीयांनी उमेदवारीमध्ये वरचे स्थान दिले आहे. मुद्द्यांपेक्षा जात, आरक्षण यावरील प्रचार आणि अभूतपूर्व फुटीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीत साखरसम्राटांनी मैदान मारले.
कऱ्हाड दक्षिणमध्ये भाजपचे आमदार हे रेठरे बुद्रुक (ता. कन्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना व जयवंत शुगर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आहेत. तर कऱ्हाड उत्तरमधील भाजपचे आमदार मनोज घोरपडे हे पडळ (ता. खटाव) येथील माण-खटाव अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे सहअध्यक्ष आहेत. पाटणमधून सलग तिसन्यांदा निवडून आलेले शंभूराज देसाई हे मरळी येथील बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आहेत. सातारा मतदारसंघातून विजयी झालेले शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अजिंक्यतारा साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आहेत. वाईतून विजयी झालेले मकरंद पाटील हे किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.