हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे: चीनी मंडी
महाराष्ट्रातील सहा साखर कारखान्यांनी दिलेल्या कोट्याच्या पलिकडे साखरेची विक्री केल्याचे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील दहा साखर कारखान्यांच्या विक्रीचे ऑडिट करण्यात आले होते. त्यात सहा कारखान्यांमध्ये अनियमितता आढळली असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने देशातील साखरेच्या मागणी पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मासिक कोटा जाहीर करण्याची पद्धत सुरू केली आहे. जेणेकरून साखरेच्या किमतींवरही नियंत्रण राहील, असा सरकारचा मानस आहे. त्याचबरोबर सरकारने साखरेची किमान विक्री किंमत २९ रुपयांवरून ३१ रुपये केली आहे.
एका बाजूला सरकार साखर उद्योगासाठी असे सकारात्मक निर्णय घेत असताना राज्यात काही साखर कारखाने किमान विक्री किमतीच्याही खाली साखर विकत असल्याची माहिती साखर आयुक्तालयाला मिळाली होती. त्याची दखल घेऊन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी संशयास्पद साखर कारखान्यांच्या विक्रीचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते.
या ऑडिट दरम्यान सहा साखर कारखान्यांनी किमान विक्री कोट्याचा भंग केल्याचे निदर्शनास आले आहे. निर्धारीत कोट्याच्या पुढे जाऊन त्यांनी साखर विक्री केली आहे. या कारखान्यांवर जीवनवश्यक वस्तू कायद्या अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल, असे साखर आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
साखरेला बाजारात मागणीच नसल्यामुळे विक्री होत नाही. परिणामी साखर कारखान्यांकडील कॅश फ्लो कमी झाला आहे. राज्यात फेब्रुवारी अखेर ११२.७४ लाख टन साखरेचा साठा होता. साखरेचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना महाराष्ट्रात गेल्या हंगामा इतकाच १०७ लाख टन किंवा त्यापेक्षा जास्त शिल्लक साठा राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात हंगामातील १९५ पैकी १६९ कारखान्यांतील गाळप बंद झाले आहे. राज्यात एकूण ९४६.६० लाख टन ऊस गाळपातून १०६.३७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp