यंदा केरळ किनारपट्टीवर ८ जूनपासून उशीरा सुरू झालेल्या मान्सूनमुळे खरीप पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. याबाबत कृषी मंत्रालयाने शुक्रवारपर्यंत दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत, तांदूळ, कडधान्ये आणि तेलबियांची पेरणी अनुक्रमे १४.६ टक्के, ५७ टक्के आणि १४.४ टक्क्यांनी घटली आहे. तर कापूस आणि तृणधान्यांची पेरणी अनुक्रमे ६ टक्के आणि ६४ टक्क्यांनी वाढले आहे. सध्या पावसाचे सुरुवातीचे दिवस आहेत. येत्या काही आठवड्यात पेरणीस वेग येईल अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
ऊस लागवड वगळता इतर खरीप क्षेत्रात आतापर्यंत ४९ टक्क्यांची घट झाली आहे. कापूस, ऊस आणि ताग या सर्व खरीप पिकांची पाच वर्षांची वार्षिक पेरणी सरासरी सुमारे १०९ दशलक्ष हेक्टर आहे. आत्तापर्यंत, ०.९२ दशलक्ष हेक्टर क्षेत्र सर्व खरीप पिकांखाली समाविष्ट केले गेले आहे.
दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले की, देशभरात १ ते १३ जून या काळात झालेल्या मान्सून पावसाचा प्रसार दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) पेक्षा ४७ टक्क्यांनी कमी आहे. IMD चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, बिपरजॉय चक्रीवादळामुळे काही अडथळ्यांनंतर मान्सून १७ ते २१ जून यांदरम्यान दक्षिण द्वीपकल्प, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पूर्वेकडील राज्यांतून पुढे जाईल.
तर ईशान्य भारत आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील पाच दिवस मुसळधार ते खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे IMD ने शुक्रवारी म्हटले आहे. तर स्कायमेटने ईशान्य भारत, गुजरातमधील कच्छ प्रदेश आणि राजस्थानच्या दक्षिण भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
यांदरम्यान, कृषी मंत्रालयाच्या मते, पिक वर्ष २०२३-२४ या वर्षासाठी भारताचे अन्नधान्य उत्पादन ५ टक्क्यांनी वाढून ३३०.५ मेट्रिक टन (mt) च्या नवीन विक्रमावर पोहोचेल. खरीप हंगामात तूर, उडीद आणि मूग ही मुख्य कडधान्ये पिकवली जातात. तर प्रमुख तेलबिया भुईमूग आणि सूर्यफूल आहेत.