…तर एक टन उसाला 48,960 रूपये भाव शक्य! हे शीर्षक वाचल्यानंतर शेतीशी संबंधित आणि अन्य लोकांच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत, याची मला जाणीव आहे. पण मी ठामपणे सांगू शकतो की एवढा दर देणे शक्य आहे. भारतात दरवर्षी 300 ते 350 लाख मेट्रीक टनापर्यंत साखरेचे उत्पादन होते. त्यातील 40 टक्के साखर ही हॉटेल आणि बेकरी उत्पादनासाठी वापरली जाते. 24 टक्के साखर शीतपेय उद्योगाला, 19 टक्के साखर मद्यार्कासाठी तर केवळ 17 टक्के साखर घरगुती वापरासाठी लागते. हे सरधोपट गणित डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे जाऊया…
शेतमालाला महागाई निर्देशांक का नाही ?
मी सिनीयर महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून 1986 साली रुजू झालो. त्यावेळी माझा महिन्याचा पगार साधारणतः 700 -1600 बेसिक तत्वावर 1630 रूपये इतका होता. याचवेळी 1986 सालामध्ये एक टन उसाचा दर 320 रुपये होता. 34 वर्षाची सेवा पूर्ण करून मी 2021 सालामध्ये सेवानिवृत्त झालो. त्यावेळी माझा पगार 2,54,000 रुपये एवढा होता. म्हणजे 34 वर्षाच्या प्रदीर्घ कार्यकाळात उसाचा दर प्रति टन 3000 रुपये म्हणजे दहा पटींनी वाढला तर माझा पगार 153 पटींनी वाढला. शासकीय नोकरदारांची पगारवाढ महागाई निर्देशांकाचा अभ्यास करून केली जाते. असाच महागाई निर्देशांक जर शेतीमालाला लागू केला असता तर शेतकऱ्यांना शेतमालाच्या दरासाठी संघर्ष करावाच लागला नसता. याच महागाई निर्देशांकामुळे आजमितीला शेतकऱ्याला प्रति टन उसाला 48,960 रुपये सहजच मिळाले असते.
साखरेसाठी द्विस्तरीय विक्री पद्धती धोरण राबविण्याची गरज…
तुम्ही यू ट्यूब, गुगल, इन्स्टाग्रामवर सर्च करा, देश विदेशातील मद्याचे दर पहा. त्यातील कितीतरी उत्पादने ही उसापासून बनविलेली पाहायला मिळतात. त्यातील 750 मिलीलीटर मद्याचे भाव एक लाख रुपयांपासून 24 कोटी रुपयांपर्यंत असलेले तुम्हाला दिसतील. अशा स्थितीत मद्य उद्योगाला सरकारने ठरविलेल्या प्रति किलो 31 रुपये दराने साखर का द्यायची ? शीतपेये, मिठाई उद्योग आणि अन्य उद्योगांची अवस्थादेखील अशीच आहे. आज मिठाईचा किलोचा दर सर्वसाधारणपणे 500 रुपये आहे. एक किलो मिठाईत साधारणपणे अर्धा किलो साखर असते. त्या अर्धा किलो साखरेचे ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळतात 15.50 रुपये आणि मिठाई व्यावसायिक प्रति किलो मिळवतो 250 रुपये. व्यावसायिकाच्या हिश्यातील थोडासा भाग जर उस उत्पादक शेतकऱ्याला मिळाला तर त्यात गैर काय? पण असे होत नाही. त्यामुळेच द्विस्तरीय विक्री पद्धती धोरणाची अंमलबजावणी करा, ही मागणी जोर धरू लागली आहे. घरगुती वापरासाठीच्या साखरेचा दर नाममात्र जरूर ठेवावा, पण औद्योगिक वापराच्या साखरेचा दर हा उद्योगांना मिळणाऱ्या नफ्यावर निश्चित करण्याची आवश्यकता आहे. एक काळ असा होता, एक टन कापूस विकला तर एक तोळा सोने येत होते. एक टन ऊस विकला तरी एक तोळा सोने येत होते. आता सोन्याचा दर तोळ्याला 70,000 हजार रुपये झाला आणि ऊसदर मात्र प्रति टन 3,000 हजार रुपयांवर आहे.
शेतकऱ्यांनी दरासाठी ‘क्रॉप हॉलिडे’ घेतला तर…
साखर कारखानदार, प्रक्रिया उद्योग करणारे व्यावसायिक यांचे नाते गाय – वासराचे आहे. ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे शत्रू नाहीत. कच्चा मालाचे शोषण हे शेतकऱ्यांचे खरे दुखणे आहे. कच्चा माल आणि पक्का माल यामध्ये समांतर व्यवस्थाच कार्यरत नाही. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाला योग्य भाव मिळवण्यासाठी जर ‘क्रॉप हॉलिडे’ घेतला तर त्याचे उद्योग, व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशात 85 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यात एक एकराच्या आत शेती असणारे 40 टक्के शेतकरी आहेत. शेतीबाहेरील क्षेत्रात रोजगारात वाढ झाली नाही, त्यामुळे शेतीचे तुकडे झाले. शेतकऱ्यांचे उत्त्पन्न घटले आणि शेतमालाला दरही अपेक्षित मिळत नसल्याने शेती तोट्याची ठरू लागली. त्यामुळे सत्ताधारी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी ठोस धोरणे राबविणे गरजेचे आहे. मात्र सध्यातरी तसे होताना दिसत नाही.
दुष्टचक्र थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची आवश्यकता…
मातीवरती स्वप्ने पेरणारा शेतकरी हा खरा कलावंत आहे. त्याच्या जगण्याचे ऑडिट करायला कुणीच तयार नाही. सातत्याने होणाऱ्या तोट्यामुळे शेतक-यांची मुले शेती व्यवसायात येण्यास तयार नाहीत. त्यांनी तरी तोट्याचा व्यवसाय का करावा ? हा प्रश्न आहे. वर्षभर शेतात राबून जर काही मिळणार नसेल तर त्यापेक्षा शहरात जावून पोट भरावे, हा विचार आज बळावत आहे. त्यातूनच शहरांची सूज दिवसागणिक वाढत आहे आणि खेडी ओस पडत आहे. हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्याच्या खांद्यावर देश उभा आहे. सकल मानवजातीच्या भरण पोषणाची जबाबदारी पेलणारा तो खांदा मजबूत ठेवण्याची गरज आहे.
(प्रा. डॉ. जालंदर पाटील हे सेवानिवृत्त प्राध्यापक तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्याशी आपण 9421201500 या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता.)