पुणे : जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत १४ साखर कारखान्यांनी सुमारे १,३२,१०,५०० टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. सरासरी १०.५६ टक्के उताऱ्यानुसार १,३९,५६,४५७ क्विंटल साखर उत्पादन घेण्यात आले आहे. श्रीसोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ११.९६ टक्के इतका सर्वाधिक उतारा घेत अव्वल स्थान मिळविले आहे. तर ऊस गाळप आणि साखर उत्पादनात बारामती ॲग्रो, दौंड शुगर हे दोन खासगी कारखाने आघाडीवर आहेत. जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे पाच लाख टनांनी अधिक ऊस गाळप झाले आहे.
हंगामाअखेर कारखान्यांचे ऊस गाळप, साखर उत्पादनात किंचित वाढ होण्याची अपेक्षा असली, तरी सध्याची कारखान्यांची क्रमवारी कायम राहण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांचा हंगाम संपुष्टात आला आहे. जिल्ह्यात सध्या श्री सोमेश्वर आणि विघ्नहर या दोन सहकारी साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू आहे. या कारखान्यांचा हंगाम आणखी आठवडाभर सुरू राहण्याची अपेक्षा असल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात गेल्यावर्षी एक कोटी २६ लाख ९१ हजार ६५८ टनाइतके ऊस गाळप समान कालावधीत पूर्ण झाले होते.