सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ऊसतोडणी अधिक गतीने सुरू आहे. अशीच गती कायम राहिल्यास आगामी महिना-दीड महिन्यात सर्व तोडणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. वैभववाडी, कणकवलीसह मालवण आणि कुडाळ तालुक्यांतदेखील ऊस लागवड करण्यात आली आहे. यावर्षी जिल्ह्यात १,२०० हेक्टरवर ऊस लागवड आहे. आतापर्यंत ४० टक्के ऊसतोडणी पूर्ण झाली आहे. एकूण २४ हजार टन उसाची तोडणी झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून ऊस तोडणीस उशीर होत असल्याने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले होते. त्यामुळेच ऊस लागवड क्षेत्र १,७०० हेक्टरवरून १,२०० हेक्टरवर आले आहे. करूळ घाट रस्ता काँक्रिटीकरणाचे सुरू होणाऱ्या कामामुळे शेतकऱ्यांनी कारखान्याकडे जिल्ह्यातील ऊस तोडणी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी केली होती. डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना प्रशासनाने हंगामाच्या सुरुवातीपासून सिंधुदुर्गातील तोडणीला गती दिली आहे. अशीच गती कायम राहिल्यास फेब्रुवारीपूर्वीच ऊस तोडणी पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.