पुणे : गळीत हंगाम २०२०-२१ आणि अंतिम टप्प्यात आला आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील सर्व साखर कारखाने बंद झाले आहेत. इतर विभागातील कारखानेही हंगाम संपविण्याच्या प्रयत्नात आहेत. राज्यात २२ एप्रिल २०२१ अखेर १५६ साखर कारखाने बंद झाले आहेत.
पुणे विभागात या हंगामात एकूण ३१ साखर कारखान्यांनी गाळप केले. त्यापैकी २५ कारखाने आतापर्यंत बंद झाले आहेत. पुणे विभागात २२८.०४ लाख टन उसाचे गाळप करून २९४.४३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. या विभागात साखरेचा सरासरी उतारा ११ टक्क्यांजवळ आहे. आतापर्यंत साखर उतारा १०.९४ टक्के नोंदविण्यात आला आहे.
साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल २०२१ पर्यंत राज्यात १९० कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात १००२.८१ लाख क्विंटल उसाचे गाळप झाले असून १०५०.९१ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४८ टक्के इतका आहे.