सांगली : जिल्ह्यात डिसेंबर अखेरपर्यंत ३५ लाख ७३ हजार टन उसाचे गाळप झाले असून ३५ लाख ४४ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले केली आहे. पंधरा ते वीस दिवसांत १० लाख ७५ हजार उसाचे गाळप केले आहे. कुंडलचा क्रांती कारखाना गाळपात आणि साखरेच्या उत्पादनात आघाडीवर आहे. साखर कारखान्यांना ऊस टंचाईचा परिणाम हळूहळू जाणवू लागल्याचे चित्र आहे.
साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होऊन अडीच महिने झाले आहेत. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून साखर कारखान्यांच्या गाळपास गती आली आहे. क्रांती कारखाना गाळप आणि साखर उत्पादनात आघाडीवर होता. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात १६ कारखान्यांनी २४ लाख ९८ हजार टन उसाचे गाळप करून २३ लाख ५२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. क्रांती कुंडल कारखान्याने ३.९८ लाख टन ऊस गाळप करून ३.४८ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. दत्त इंडियाने २.८३ लाख क्विंटल तर राजारामबापू पाटील, साखराळेने ३.५१ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.