सोलापूर : गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने १०७ दिवसांमध्ये ८ लाख ५ हजार ८४५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. आतापर्यंत, बी हेवी मोलॅसेसमधील साखरेची घट गृहीत धरुन सरासरी १०.६३ टक्के उताऱ्याने आठ लाख ११ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी ही माहिती दिली. कारखान्याचे इतिहासात पहिल्यांदाच १०७ दिवसांत आठ लाख गाळप झाले आहे. एकूण ऊस गाळपापैकी ८० टक्के म्हणजे ६,३१,८५५ टन गाळप कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे आहे.
चेअरमन पाटील म्हणाले की, कारखान्याने आत्तापर्यंत केलेल्या गाळपामुळे ऊस बिलापोटी २३३ कोटी व तोडणी वाहतुकीपोटी ७२ कोटी ५० लाख, अशी एकूण ३०० कोटींची उलाढाल झालेली आहे. आसवानी प्रकल्पातून ३९ लाख ४० हजार ४४८ लिटरचे स्पिरीट उत्पादन झाले असून सहवीज निर्मिती प्रकल्पातून ११४ दिवसांमध्ये चार कोटी ९४ लाख ८६ हजार युनिटचे उत्पादन झाले असून कारखाना वापर सोडून दोन कोटी ८० लाख युनिट विक्री केली आहे. १५ जानेवारीअखेरच्या उसाचे अनुदानासह बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले आहे. फेब्रुवारी महिन्यातील उसाला २,९५० रुपये दर दिला जाईल. तर मार्च महिन्यातील उसाला प्रती टन ३,००० रुपये दर दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.