दामाजी कारखान्यात आतापर्यंत दीड लाख क्विंटल साखर उत्पादन : चेअरमन शिवानंद पाटील

सोलापूर : संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात १६ ते ३० नोव्हेंबरअखेर पुरवठा केलेल्या उसाचे बिल २,७०१ रुपये याप्रमाणे सभासद शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहे. कारखान्याने एकूण १,५८,९४५ मे. टन गाळप केले असून एकूण दीड लाख क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.

चेअरमन पाटील म्हणाले की, कारखान्याच्यावतीने सभासदांना सवलतीचे दराने दिली जाणारी गुढी पाडवा व दिपावली सणाची चालू वर्षाची राहिलेल्या सभासदांची साखर डिसेंबर २०२३ अखेर कारखाना साईटवरुन घेऊन जावी. कारखान्यावर कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना ऊस पुरवठा करणाऱ्या सभासद शेतकऱ्यांच्या विश्वासावर कारखाना पूर्ण क्षमतेने चालू आहे. निवडून आल्यापासून तालुक्यातील सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम करीत आहे. कारखान्याच्या वजन काट्याबाबत व तोडणी प्रोग्रामबाबत सोशल मीडियात चुकीचे मेसेज टाकून शेतकऱ्यांचा संचालक मंडळावर अविश्वास निर्माण करण्याच्या षडयंत्राला शेतकरी कदापीही बळी पडणार नाहीत. शेतकऱ्यांनी आपला ऊस कोणत्याही काट्यावर वजन करुन दामाजीच्या वजन काट्यावर आणावा व प्रत्यक्ष वजनाची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here