महाराष्ट्रात साखर कारखाने बंद होण्यासह सध्याचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या सोबतच राज्यात १००० लाख क्विंटल (१०० लाख टन) साखर उत्पादन झाले आहे.
महाराष्ट्रातील साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च २०२२ अखेर राज्यात २ साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. सध्या कोल्हापूर विभागातील २ साखर कारखाने बंद झाले आहेत.
साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये ६ मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रात १९७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ९९०.७४ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत १०२०.७१ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३० टक्के आहे.
राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये ६ मार्च २०२२ पर्यंत कोल्हापूर विभागात २२९.१४ लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे तर २६८.०२ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्यात सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागाचा आहे. येथील साखर उतारा ११.७० टक्के झाला आहे. महाराष्ट्रात साखर उताऱ्यात नेहमीच कोल्हापूर विभाग अग्रेसर राहिला आहे.
राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. सोलापूरमध्ये सर्वाधिक ४६ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात भाग घेतला आहे. येथे ६ मार्च २०२२ पर्यंत २३२.९८ लाख टन उसाचे गाळप करून २१६.८३ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे.