कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त शुगर्सच्या कार्यस्थळावर तालुक्यातील पंधरांहून अधिक गावांतील सुमारे १०५० पूरग्रस्तांच्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय ४०० जनावरांची छावणी सुरू करण्यात आली आहे. गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी शासनाच्या मदतीविना स्वखर्चाने पूरग्रस्तांची छावणी सुरू केली आहे. आपत्ती काळात गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून घाटगे यांनी माणुसकीच्या भावनेतून हे मदतकार्य केले आहे. गुरुदत्त शुगर्स ने जपलेले सामाजिक भान खरोखरच कौतुकास्पद आहे.
गुरुदत्त कारखाना परिसरातील बस्तवाड, अकिवाट, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, जुने दानवाड, नवे दानवाड, कुरुंदवाड, चंदूर आदी गावांतील १०५० हून अधिक पूरग्रस्त व चारशे जनावरांना या छावणीत आधार मिळाला आहे. पाच दिवसांपासून एक हजाराहून अधिक पूरग्रस्तांनी आपल्या कुटुंबासह जनावरांना घेऊन छावणीचा आधार घेतला आहे. छावणीतील पूरग्रस्त, जनावरांची हेळसांड होऊ नये, यासाठी कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी लक्ष दिले आहे.
याबाबत ‘चीनीमंडी’शी बोलताना गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे म्हणाले कि, गुरुदत्त शुगर्स ने नेहमीच सामाजिक भान जपले आहे. सामाजिक कार्य व गुरुदत्त शुगर्स हे एक समीकरण तयार झाले आहे. लोकांना मदत करणे हे आमचे कर्तव्य समजतो. संकट काळात मानवतेच्या भावनेतून सर्वानीच नागरिकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. २००५, २०१९, २०२१ व यावर्षी आम्ही कारखान्याच्या माध्यमातून शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता, पूरग्रस्तांसाठी निवारा छावणी उभी केली आहे. आम्ही आमच्या कुटुंबियांप्रमाणे त्यांची काळजी घेत आहोत. पुढील काळात देखील नैसर्गिक आपत्तीच्या व इतर सामाजिक कार्यात गुरुदत्त शुगर्स नागरिकांच्या पाठीशी उभा राहील.