सोलापूर : प्रशासकीय संचालक मंडळाने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शिल्लक असलेले २२ लाख ५२ हजार ५३ रुपये प्राधिकरणाकडे भरावे, असे लेखी पत्र करमळा तहसीलदारांकडे दिले होते. ही रक्कम आयसीआयसीआय बँकेतून निवडणूक शाखेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आरसीसी कारवाई केल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी व इतर सरकारी देणे दिल्यानंतर राहिलेले पैसे जात आहेत, अशी माहिती प्रशासकीय संचालक महेश चिवटे, संजय गुटाळ यांनी दिली.
प्रशासकीय संचालक अध्यक्ष बाळासाहेब बेंद्रे म्हणाले की, कारखान्याची २०१८-१९ मधील शेतकऱ्यांची देणी दिल्यानंतर २२ लाख रुपयांची रक्कम शिल्लक राहिली होती. ही रक्कम निवडणूक आयोगाकडे वर्ग होणार आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मे पर्यंत स्थगित करण्याचे आदेश सहकार खात्याने दिल्यामुळे पुढील प्रक्रियेकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे. महेश चिवटे म्हणाले की, कारखान्याच्या दीडशे कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणाला सरकारने थकहमी द्यावी, अशी शिफारस सहकार आयुक्तांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे यासाठी पाठपुरावा सुरू आहे.