सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोलापुरात थकीत ऊस बिलांप्रश्नी साखर सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.‘स्वाभिमानी’चे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची बिले मोठ्या प्रमाणात थकवली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याचे ‘स्वाभिमानी’ने दाखवून दिले.आंदोलनाची दखल घेत साखर सहसंचालक प्रकाश अष्टेकर व उपसहसंचालक पांडुरंग साठे यांनी संबंधित साखर कारखान्याशी संपर्क साधत आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांची ऊसबिले तत्काळ जमा करण्याचे निर्देश दिले.
यावर्षी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस दराची स्पर्धा करून कारखाने दहा दिवसांत बिले जमा करतील,असे शेतकऱ्यांना वाटत असतानाच साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात बिले थकविली आहेत. याबाबत युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी सांगितले की, साखर सहसंचालक प्रकाश आष्टेकर यांच्या लेखी आश्वाअसनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. परंतु १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण थकीत ऊसबिले न मिळाल्यास संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात स्वाभिमानचे इक्बाल मुजावर, पप्पू पाटील, शहाजी सोमवंशी, मोहसिन बिराजदार, दत्तात्रय पांढरे, नितीन मस्के आदी उपस्थित होते.