सोलापूर : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या जुन्या प्रशासकीय मंडळात बदल करण्यात आला आहे. प्रादेशिक साखर सहसंचालकांनी प्राधिकृत अधिकारी बेंद्रे यांची नियुक्ती कायम ठेवून उर्वरित अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली आहे. विलासराव घुमरे, डॉ. वसंत पुंडे, ॲड. दीपक देशमुख या तीन अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जुन्या प्रशासकीय मंडळाची मुदत संपली होती. त्यामुळे प्रशासकीय कारभारात अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या. त्यामुळे जुने प्रशासकीय मंडळ बरखास्त करून नव्याने निवडी करण्यात आल्या आहेत.
गेल्या महिन्यात आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आदिनाथ कारखाना वाचला पाहिजे व पुन्हा सहकारी तत्त्वावर चालला पाहिजे यासाठी अकलूजला सर्व गटांची मीटिंग बोलावली होती. त्यावर करमाळा तालुक्यातील प्रमुख गटांच्या प्रमुख नेत्यांनी सकारात्मक विचार व्यक्त करून सहमती दर्शवली होती. करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांची कुचंबणा होत होती. वेळेवर ऊस गाळप होत नव्हते.