सोलापूर : करमाळा तालुक्यात बागल गटाला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी सातत्याने आतापर्यंत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला लक्ष्य केले गेले आहे. पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी कारखान्याच्या निवडणुकीसाठी बागल गटाने थांबण्याचा निर्णय घेतला आहे. बागल गटाच्यावतीने उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्वांनी दोन दिवसांत आपले उमेदवारी अर्ज माघारी घ्यावेत, असे आवाहन बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे यांनी केले.
बागल संपर्क कार्यालयात कारखान्याच्या निवडणुकीबाबत विचारविनिमयासाठी बैठक झाली. या बैठकीत सर्वांनी एकमुखाने निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार गटाच्या नेत्या, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल, मार्गदर्शक विलासराव घुमरे यांना देण्यात आले. यावेळी ‘मकाई’चे माजी चेअरमन व नेते दिग्विजय बागल उपस्थित होते. नेते जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करावा, असे ठरले. याबाबत, विलासराव घुमरे म्हणाले की, गेल्या वीस वर्षांमध्ये बागल गटाच्या राजकारणाला अडचणीत आणण्यासाठी आदिनाथ कारखान्याला अडचणीत आणले गेले. आता तसा प्रयत्न होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. आम्ही फक्त या निवडणुकीपुरते थांबलो आहोत.