सोलापूर : भैरवनाथ शुगर वर्क्स, आलेगांव बुद्रुक (ता. माढा) साखर कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये गाळपासाठी आलेल्या उसाचे कारखान्याने जाहीर केल्याप्रमाणे २८०० रुपये पहिले ॲडव्हान्स बिलासह आतापर्यंत गाळप झालेल्या उसाचे सर्व थकीत बिल मिळण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर पृथ्वीराज सावंत यांनी आंदोलकांची भेट घेऊन थकित बिले देण्याचे लेखी पत्र दिले. यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
चालू गळीत हंगामासाठी भैरवनाथ शुगरने परिपत्रक काढून २८०० रुपये प्रति टन ऊस दर देण्याचे जाहीर केले होते. मात्र, आतापर्यंत केवळ एका आठवड्याचे प्रतिटन २५०० रुपये प्रमाणे बिल देऊन कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत ८ डिसेंबरपासून अखेरपर्यंत गाळप झालेले सर्व ऊस बिले थकित असून तातडीने देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकरी आंदोलकांनी केली.
कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आमरण उपोषण आंदोलन चालू केले होते. दुसऱ्या दिवशी ऊस बिल देण्याचा निर्णय न झाल्यास उग्र आंदोलन करण्याच्या इशाऱ्यानंतर ‘भैरवनाथ शुगर’चे मॅनेजिंग डायरेक्टर पृथ्वीराज सावंत यांनी आंदोलकांशी भेट घेऊन थकित बिले देण्याचा शब्द देऊन लेखी पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केल्याने आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी उपोषणकर्ते महेंद्र पाटील, माजी उपसरपंच सतीश केचे, लखन काळे, माढा तालुका धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, माढा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आदित्य जाधव, दादासाहेब कळसाईत, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक दीपक लांडगे, अमोल देवकाते, आप्पा केचे, रवींद्र माने, गणेश वाघ, उद्धव केचे, संजय चोरमले, संतोष लिंगे, आप्पा कोकाटे, ओंकार गायकवाड, किशोर कवडे, ज्योतीराम वाघमारे, अभिजित गायकवाड, राम काळे, हनुमंत पाटील, तुकाराम कवडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
… तर उग्र आंदोलन करु
भैरवनाथ शुगरने १५ मार्च अखेरपर्यंत सर्व थकीत शेतकऱ्यांची बिले जमा करण्याचे आश्वासन दिले असून दिलेल्या कालावधीमध्ये थकित बिले न दिल्यास भैरवनाथ शुगर वर्क्स, पुणे येथील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असे आंदोलक महेंद्र पाटील यांनी सांगितले.
तांत्रिक अडचणीमुळे विलंब…
‘भैरवनाथ शुगर’ ने आतापर्यंतच्या सर्व गळीत हंगामामधील ऊस बिले दिली आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे बिले देण्यास विलंब झाला असून मार्च अखेरपर्यंत कारखान्याने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यात येतील, असे भैरवनाथ शुगर वर्क्सचे मॅनेजिंग डायरेक्टर पृथ्वीराज सावंत यांनी सांगितले.