सोलापूर : ऊस बिले थकविणाऱ्या विभागातील १७ साखर कारखान्यांना आयुक्तांकडून नोटिसा

सोलापूर : सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या १७ साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणी  १८ मार्च रोजी पुण्यात साखर आयुक्त कार्यालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कारखान्यांनी हे आश्वासन पाळलेले नाही. त्यामुळे त्यांना साखर आयुक्तांनी पुन्हा नोटीस बजावल्या आहेत.

यापूर्वी सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांनी एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांना नोटिसा दिल्या होत्या. त्यानंतर तत्कालीन साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांच्यासमोर १३ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली होती. त्यानंतर सिद्धेश्वर कुमठे, पांडुरंग श्रीपूर, युटोपियन, आवताडे शुगर, लोकनेते बाबूरावआण्णा पाटील व बबनराव शिंदे तुर्क पिंपरी या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले आहेत. मात्र पैसे न दिलेल्या सोलापूर जिल्ह्यातील १३ व धाराशिव जिल्ह्यातील चार अशा १७ साखर कारखान्यांची एफआरपी देण्यासाठी १८ मार्च रोजी साखर नवे साखर आयुक्त सिद्धाराम सालिमठ यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

माजी मंत्री तथा भूम-परांड्याचे आमदार तानाजी सावंत व सावंत बंधूच्या भैरवनाथ आलेगाव, भैरवनाथ लवंगी, भैरवनाथ वाशी, भैरवनाथ तेरखेडा व भैरवनाथ सोनारी या सहा साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत. नोटीस बजावलेल्यांमध्ये या सहा कारखान्यांसह सिद्धनाथ शुगर तिर्हे, लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे, जकराया शुगर, इंद्रेश्वर बार्शी, धाराशिव (सांगोला), येडेश्वरी बार्शी, मातोश्री अक्कलकोट, संत दामाजी, जय हिंद, गोकूळ (सर्व सोलापूर) यांचा समावेश आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या: 

सांगली : पाच लाख टन गाळप करून हुतात्मा कारखान्याच्या ऊस हंगामाची सांगता

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here