सोलापूर : प्रतिवर्षाप्रमाणे पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना कार्यस्थळावरून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या निरनिराळ्या दिंड्या व दिंडीतील वारकऱ्यांना पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते अल्पोहाराच्या वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. प्रतिवर्षी नाशिक, नगर, जामखेड, शेगाव व इतर ठिकाणच्या अनेक पालख्या व दिंड्या विठ्ठलराव शिंदे युनिट एक पिंपळनेर या कारखान्यावरून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात.
विठ्ठल कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ. बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या पालख्या व दिंड्यांमध्ये समाविष्ट असलेल्या वारकऱ्यांना प्रतिवर्षी कारखान्यामार्फत लाडू व चिवडा या अल्पोहाराचे वाटप करण्यात येते. चालू वर्षी १० जुलैपासून वारकऱ्यांना अल्पोहाराचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जामखेड येथील ह.भ.प. रासकर महाराज यांची ४०० ते ५०० वारकऱ्यांची दिंडी प्रतिवर्षी मुक्कामी कारखाना कार्यस्थळावर येत असून, त्यांना कारखान्यामार्फत या वर्षी १३ जुलै रोजी मुक्कामी दिंडीस जेवण देण्यात येणार आहे.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक एस.एन. डिग्रजे, जनरल मॅनेजर एस. आर. यादव, जनरल मॅनेजर (प्रोसेस) पी.एस. येलपले, चिफ इंजिनिअर एस. डी. कैचे, केन मॅनेजर एस.पी. थिटे, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही. बागल, असि. परचेस ऑफिसर एस.व्ही. चौगुले, सिव्हिल इंजिनिअर एस. आर. शिंदे, कामगार प्रतिनिधी अनिल वीर, प्रशासन प्रमुख शशिकांत पवार हे उपस्थित होते.