सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यावर्षी ३४ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे. मात्र, ऊस तोडणी यंत्रणा कमी असल्याचा फटका जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांना बसला आहे. गेल्या ६० दिवसांत ६० लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. यावर्षी गाळप क्षमता वाढून एक लाख ५६ हजार मेट्रिक टन इतकी आसताना दररोज एक लाख १० मेट्रिक टन गाळप होत आहे.
जिल्ह्यात एक नोव्हेंबर आणि त्यानंतर आठवडाभरात साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले. मागील वर्षीपेक्षा यंदा दररोज २० हजार मेट्रिक टन गाळप क्षमता वाढली असली तरी गाळप मात्र कमी क्षमतेने होत आहे. दररोज एक लाख ५६ हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असल्याने किमान एक लाख ६५ हजार मेट्रिक टन गाळप होणे अपेक्षित आहे. मात्र तशी स्थिती नाही. जिल्हातील मोजके साखर कारखाने सोडले तर बहुतेक साखर कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्रणा भरली नाही. त्यामुळे ट्रॅक्टर, मजूर, बैलगाड्या व ऊस तोडणारे कोयते आले नाहीत. याचा फटका म्हणून २० ते २२ कारखाने उसाअभावी दोन- चार तास चालतात. कर्नाटकातील साखर कारखान्यांची ऊस तोडणी यंत्रणा १५ जानेवारीनंतर रिकामी होईल. त्यानंतर गाळप वाढेल असे कारखानदारांचे म्हणणे आहे.