सोलापूर : होटगी येथील शेतकऱ्याला श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस बिलापोटी दिलेला तब्बल ८० हजार रुपयांचा धनादेश कारखान्याच्या खात्यात आवश्यक रक्कम नसल्याचे कारण दाखवत परत आला आहे. त्यामुळे कारखान्याने बोगस धनादेश देवून आपली आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार ऊस उत्पादक शेतकरी सुभाष पाटोळे यांनी साखर उपायुक्तांकडे केली आहे. ऊसाचे बिल तातडीने मिळावे. अन्यथा कारखाना प्रशासनाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही तो धनादेश पाटोळे यांनी या तक्रारीत दिला आहे.
होटगी स्टेशन येथील शेतकरी पाटोळे यांनी मार्च २०२४ मध्ये सिध्देश्वर साखर कारखान्याला आपला ऊस गाळपासाठी दिला होता. कारखान्याने २३०० रुपये क्विंटल या दराने ऊस बिल द्यायचे होते. कारखान्याने १० ऑगस्ट रोजी पाटोळे यांना धनादेश दिला. १८ जून २०२४ या तारखेचा हा ८० हजार रुपयांचा धनादेश पाटोळे यांनी १२ ऑगस्ट रोजी अक्सिस बँकेतील आपल्या खात्यावर भरला. मात्र, कारखान्याच्या खात्यावर आवश्यक रक्कम नसल्याने धनादेश वटला नाही. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटोळे यांनी येथील साखर उपायुक्त कार्यालयाकडे लेखी तक्रार केली आहे. दरम्यान, कारखान्याचे मुख्य प्रवर्तक धर्मराज काडादी यांनी सांगितले की, काही तांत्रिक कारणामुळे काही वेळा धनादेश परत येतात. संबधित शेतकऱ्यांची तक्रार प्रशासनाला कळाली आहे. त्यांना लवकरच ऊसाचे बिल मिळेल. कारखाना कोणाचीही फसवणूक करणार नाही.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.