सोलापूर : जिल्ह्यातील काही कारखाने दरवर्षी पोळा गोड व्हावा, यासाठी दरवर्षी पोळा सणाला ऊस बिलाचा हप्ता देतात. ही अनेक वर्षांची परंपरा आहे. सोमवारी (ता. २) पोळा सण आहे. मात्र, कारखान्यांनी सण दोन दिवसांवर येऊनही ऊसबिलाचा दुसरा हप्ता दिला नाही. या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यांसह मंगळवेढा, उत्तर सोलापूरचा काही भाग वगळता शहरांसह गावातील दुकाने सजली आहेत. कंडे, गोंडे, मोरक्या, रंग आदी विविध वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. मात्र, बाजारात खरेदीसाठी शेतकऱ्यांची वर्दळ दिसत नाही. बैलांचा सांभाळ,वाढलेली मजुरी, ट्रॅक्टरसह आधुनिक तंत्रज्ञान यामुळे शेतकऱ्यांकडील बैलांची संख्या घटली आहे. शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत यांत्रिकीकरणाकडे वळले आहेत. त्याचाही परिणाम दिसत आहे.
बैल पोळा सणावेळी काळ्या आईची सेवा करणाऱ्या बैलजोडीची वर्षातून एकदा श्रावण अमावस्येला सजवून त्यांची खांदेमळणी, पूजा केली जाते. तसेच पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो. पोळा सणाला दरवर्षी जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांकडून ऊसबिलाचा हप्ता दिला जातो. मात्र, यंदा सण दोन दिवसांवर आला असतानाही एकाही साखर कारखान्याने बिल दिले नाही. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसत नसल्याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. दरम्यान, एकीकडे उसासह सर्वच पिकांचे उत्पादन खर्च वाढले असताना हाती ऊसबिले न पडल्याने पोळा कसा साजरा करावा, या विवंचनेत शेतकरी आहेत. परिणामी बाजार सजूनही खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद दिसत नाही. त्याचा फटका दुकानदार, व्यापाऱ्यांना बसत आहे.