सोलापूर : करमाळा तालुक्यात श्री आजिनाथ, श्री मकाई हे दोन सहकारी साखर कारखाने आहेत. शिवाय तालुक्यात मंत्री प्रा. तानाजी सावंत यांचा भैरवनाथ शुगर (विहाळ) तर माढ्याचे विक्रमसिंह शिंदे चेअरमन असलेला विठ्ठल रिफाइंड शुगर (पांडे) असे चार साखर कारखाने आहेत. तालुक्यात साधारणपणे ३० लाख मे. टन ऊस उपलब्ध आहे. एका बाजूला मोठ्या प्रमाणावर ऊस असताना दुसऱ्या बाजूला चारही साखर कारखाने चालू हंगामात बंद आहेत. त्यामुळे तालुक्याबाहेरील कारखान्यांना ऊस घालण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.
मागील गळीत हंगामात तालुक्याबाहेरील कारखान्यांनी उसाचा दर जास्त दिला. त्या तुलनेत भैरवनाथ शुगर व विठ्ठल रिफाइंड शुगर यांनी दर दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाहेर ऊस पाठवला. अंबालिका शुगर (राशीन), बारामती ॲग्रो (शेटफळगढे), दौंड शुगर, बारामती अॅग्रो (हाळगांव ता. जामखेड), सहकार महर्षी अकलूज, विठ्ठलराव शिंदे (पिंपळनेर), विठ्ठल कार्पोरेशन (म्हैसगाव) या साखर कारखान्यांना तालुक्यातून चांगला ऊस पुरवठा झाला आहे. मागील गळीत हंगामात आदिनाथ सहकारी साखर कारखाना व मकाई सहकारी साखर कारखाना हे दोन्ही साखर कारखाने बंद होते. मकाई कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे. भैरवनाथ शुगर व विठ्ठल रिफाइंड शुगर हे दोन साखर कारखाने सुरू होते. चालू वर्षी मात्र भैरवनाथ शुगर बंद ठेवण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. विठ्ठल रिफाइंड शुगर सुरू होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, अद्याप कारखाना सुरू होणार की नाही, याबाबत निश्चित माहिती देण्यात आली नाही. सध्या करमाळा तालुक्यातून बारामती अॅग्रो व अंबालिका शुगर या दोन साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर ऊस जातो.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.