सोलापूर : उपळाई ठोंगे (ता. बार्शी) येथील इंद्रेश्वर शुगर मिल्स साखर कारखान्याच्या बगॅस डेपोस लागलेल्या भीषण आगीत सहा हजार मेट्रिक टन लूज बगॅस तसेच प्लँट अँड मशिनरीमध्ये आर.बी.सी. व एम.बी. सी. कॅरिअर स्ट्रक्चरचे साइडपत्रे, इलेक्ट्रिक मोटारी, गिअर बॉक्सेस, केबल वायर आदी जळून खाक झाले. यात सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. कारखान्याच्या अग्निशामक वाहनाने आणि बगॅस हैड्रंट सिस्टीमने आग विझवल्याने मोठी हानी टळली असून, कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या ठिकाणी अंदाजे २५ हजार मेट्रिक टन बगॅस साठा होता.
बुधवारी (ता. २६) दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान अचानक बगॅस साठ्याला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच विझवण्यासाठी कारखान्याच्या अग्निशामक वाहनाने प्रयत्न केले; मात्र आग वाढत असल्याने ती विझवणे शक्य नसल्याने तत्काळ कारखान्याकडील फायर हैडूंट सिस्टीम चालू करून आग आटोक्यात आणली. सध्या कारखान्याचा गळीत हंगाम बंद असून वाढत्या उन्हामुळे तापमानात वाढ होत असल्यामुळे आग लागल्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. आगीत कारखान्याचे दोन कोटी ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कारखान्याचे जनरल मॅनेजर ए. एस. जाधव यांनी सांगितले.