सोलापूर : थकीत बिलासाठी जनहित शेतकरी संघटना करणार रास्ता रोको आंदोलन

सोलापूर : सहकार शिरोमणी वसंतराव काळे व विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे या दोन्ही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे पैसे थकवले आहेत. मागील वर्षी गाळप झालेल्या उसाचे पैसे चार महिन्यानंतरही मिळत नसल्याने शेतकऱ्यांची शेतीची कामे, घरबांधणी, लग्नकार्य आदी कामे खोळंबली आहेत. १३ जुलैपूर्वी एफआरपीची थकीत रक्कम व १५ टक्के व्याजासह उसाचा दुसरा हप्ता द्यावा अन्यथा रास्तारोकोपेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे प्रमुख प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.

थकीत ऊस बिलांमुळे संतप्त शेतकऱ्यांनी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वात शनिवार १३ जुलैला भोसेपाटी (ता. पंढरपूर) येथे रास्ता रोको पुकारला आहे. दरम्यान याबाबत गुरसाळे येथील विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील म्हणाले की, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे फेब्रुवारी, मार्चमध्ये गाळप झालेल्या उसाचे पैसे शेतकयांना गरजेनुसार थोडे थोडे देण्यात येत आहेत. मागील कर्जाचा डोंगर जास्त असल्याने त्याचे पुनर्गठण करणे, नवीन पैसे उपलब्ध करणे यासाठी थोडा वेळ जात आहे. येत्या काही दिवसात सर्वच पैसे देण्याची व्यवस्था केली आहे. तर सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे म्हणाले की, बँकेच्या कर्ज प्रकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मागील गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाचे ७ ते ९ कोटी रुपयांचे पेमेंट देणे बाकी आहे. ते पुढील आठवड्यात देण्याची प्रक्रिया सुरू करत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here