सोलापूर : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार नारायण पाटील यांची तर उपाध्यक्षपदी केम ऊस उत्पादक गटातून विजयी झालेले महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवारी (ता. २८) रोजी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत निवडणूक निर्णय अधिकारी अभयसिंह भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी घेण्यात आल्या. आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील संजीवनी पॅनेल विजयी झाले आहे. त्याचे सर्व २१ संचालक निवडून आले आहेत.
आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी आमदार नारायण पाटील यांचे नाव निश्चित होते. मात्र उपाध्यक्ष पदासाठी कोणाला संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रविवारी अकलूज येथे झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी मागणी केली होती. त्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सर्व संचालकांशी विचारविनिमय करून उपाध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला. पाच वर्षांत पाच संचालकांना उपाध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. सुरुवातीला महेंद्र पाटील यांना संधी देण्यात आली आहे.
आमदार नारायण पाटील म्हणाले कि, आदिनाथ कारखान्यावर कोट्यवधीचे कर्ज आहे, अशा परिस्थितीत मी कारखान्याचा अध्यक्ष झालो आहे. शासनाची मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहे. तसेच आमचे नेते शरद पवारसाहेब यांचे मार्गदर्शन घेणार आहे. कारखाना सुरू झाला पाहिजे असा सकारात्मक दृष्टिकोन सर्वांनी ठेवण्याची गरज आहे.
यावेळी माजी संचालक राजेंद्रसिंहराजे भोसले, माजी सभापती अतुल पाटील, सविताराजे भोसले, आदिनाथचे संचालक डॉ. हरिदास केवारे, देवानंद बागल, नवनाथ झोळ, अॅड. राहुल सावंत, डॉ. अमोल घाडगे, किरण कवडे, संतोष खाटमोडे-पाटील, दत्तात्रय गव्हाणे, श्रीमान चौधरी, महादेव पोरे आदी उपस्थित होते.