सोलापूर : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक आज (ता. २८) कारखाना स्थळावर होणार आहे. सकाळी ११ वाजता ही निवड करण्यात येणार आहे. चेअरमनपदी आमदार नारायण पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी दत्तात्रय देशमुख, महेंद्र पाटील, नवनाथ झोळ, डॉ. हरिदास केवार, दादासाहेब पाटील यांची नावे चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील संजीवनी पॅनेलचे २१ उमेदवार विजयी झाले आहेत. तर माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनेलचा पराभव झाला होता.
अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर रविवारी (ता. २७) माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार पाटील यांचे अध्यक्षपदासाठी एकमुखाने नाव घेण्यात आले. पाच वर्षे आमदार नारायण पाटील हे कारखान्याचे अध्यक्ष राहणार आहेत. तर उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी आपले म्हणणे मोहिते- पाटील यांच्यासमोर मांडले आहे. कारखाना गेली अनेक वर्षापासून बंद असून हा आर्थिक अडचणीत आहे. या निवडणुकीत आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय शिंदे, प्रा. रामदास झोळ यांनी पॅनेल उभे केले होते. मात्र, या निवडणुकीपासून माजी आमदार जयवंतराव जगताप व बागल गट अलिप्त राहिले. खरी लढत आमदार नारायण पाटील व माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनेलमध्ये झाली होती.