सोलापूर : यंदा दीड लाख हेक्टरमधील ऊस गाळपासाठी उपलब्ध, लागवडीत मोठी घट

सोलापूर : यंदा राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊस क्षेत्रात घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या गळीत हंगामात साखर कारखान्यांची ऊस गाळपासाठी कसोटी लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील ६० हजार हेक्टर उसाचे क्षेत्र घटले आहे. तर येत्या गाळप हंगामासाठी सोलापूर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे साखर कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले. यंदाच्या उन्हाळ्यात उसासाठी पाण्याची मोठी कमतरता जाणवली. त्यामुळे उसाची म्हणावी तशी वाढ झाली नसल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात मागच्या वर्षी २ लाख १० हजार ९७० हेक्टर उसाचे क्षेत्र होते, यंदा ते १ लाख ५० हजार ५८६ हेक्टरवर आले आहे. साधारण ६० हजार ३७१ हेक्टरने क्षेत्रात घट झाली आहे. राज्यात सोलापूरसह ऊस उत्पादक २७ जिल्ह्यांपैकी २१ जिल्ह्यांत क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे ऊस उत्पादनात मोठी घट होणार आहे. सोलापूर विभागातील सोलापूर व धाराशिव हे दोन जिल्हे मिळून १,०३,४६५ हेक्टर उसाचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे राज्यात या वर्षी १८३ लाख टन ऊस उत्पादन कमी होण्याची शक्यता कमी आहे.

पंढरपूर तालुक्यात यंदा ३६ लाख टन ऊसाचे गाळप शक्य

पंढरपूर तालुक्यात यंदा सहा साखर कारखान्यांच्या माध्यमातून ३६ लाख मे. टन उसाचे गाळप होईल, अशी अपेक्षा आहे. तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे, विठ्ठल, पांडुरंग, सहकार शिरोमणी, सीताराम आणि कृषिराज शुगर या कारखान्यांसह तालुक्याबाहेरील काही कारखान्यांच्या माध्यमातून उसाचे गाळप केले जाते. तालुक्यातील सहा कारखान्यांकडे ५४ ते ५५ हजार हेक्टर उसाची नोंद आहे, अशी माहिती कारखान्यांच्या सूत्रांनी दिली.

मागील वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती याचा उसाच्या वाढीवर परिणाम झाला. कोलमडलेले उजनीच्या पाण्याचे नियोजन यामुळे पाण्याची भासत असलेल्या कमतरतेमुळे उसाचे क्षेत्र घटलेले दिसले. परंतु यंदा वरुणराजाने शेतकऱ्यांवर वेळेवर कृपादृष्टी दाखवल्यामुळे उसाचे उत्पन्न वाढले आहे. तालुक्यातील सहा कारखान्यांच्या माध्यमातुन यंदाच्या गाळप हंगामात ३६ ते ३७ लाख मे.टन गाळपाची कारखाना प्रशासनाला अपेक्षा आहे. विठ्ठलराव शिंदे युनिट २ कडे आतापर्यंत ७००० हेक्टरवरील उसाची नोंद झाली आहे. कारखान्याला साडेपाच लाख मे.टन गाळपाची अपेक्षा आहे. तर विठ्ठल कारखान्याकडे १५,२०९ हेक्टरमधील उसाची नोंद आहे. पांडुरंग कारखान्याकडे सर्वाधिक १२,००० हेक्टर तर सहकार शिरोमणी कारखान्याकडे १० हजार हेक्टर ऊस नोंद आहे. सीताराम कारखान्याकडेही १० हजार हेक्टर ऊसाची नोंद आहे.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here