सोलापूर : साखर हंगाम सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला आहे. मात्र उसाचे पैसे देण्यासाठी कारखानदारांनी हात आखडता घेतला आहे. याबाबत रतय क्रांती संघटनेने केलेल्या तक्रारीनंतर प्रादेशिक सहसंचालकांनी जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे. सिद्धेश्वर, संत दामाजी, संत कुर्मदास, लोकनेते, दि सासवड, लोकमंगल, विठ्ठल, सिद्धनाथ, जकराया, इंद्रेश्वर, भैरवनाथ, युटोपियन, भैरवनाथ आदी कारखान्यांचा यात समावेश आहे. आठ दिवसांत ऊस उत्पादकांचे पैसे द्या, अन्यथा आरआरसीची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा नोटिशींतून देण्यात आला आहे. ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य सुहास पाटील, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे दीपक भोसले व पदाधिकाऱ्यांनी हा विषय सहसंचालकांसमोर मांडला होता.
जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांची धुराडी पेटली असली तरी ऊस उत्पादकांचे पैसे देण्याची साखर कारखानदारांची मानसिकता दिसत नाही. साखर हंगाम सुरू होऊन ५० दिवसांचा कालावधीत लोटला तरी कारखानदारांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रयत क्रांती शेतकरी संघटनेने याची तक्रार केली होती. त्यानंतर प्रादेशिक साखर कार्यालयाने जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे. याबाबत प्रादेशिक सहसंचालक प्रकाश आष्टेकर म्हणाले की, १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंतचे सोलापूर जिल्ह्यातील २३ व धाराशिव जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांकडे ४७२ कोटी ३९ लाख रुपये एफआरपीचे थकले आहेत. त्यानंतरच्या गाळपाच्या १५ दिवसाची एफआरपी देण्याची मुदतही संपली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचे पैसे द्यावेत. अन्यथा कारवाई केली जाणार आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.