सोलापूर : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आवताडे शुगरतर्फे कारखान्यातील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ केली जात असल्याची घोषणा अवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांनी केली. त्यानुसार, दैनिक वेतनावरील कामगारास जून २०२४ पासून, हंगाम २०२२-२३ मध्ये रुजू झालेल्यांना २००० रुपये व २०२३-२४ मध्ये रुजू झालेल्या कामगारांना १७५० रुपयांप्रमाणे वेतनवाढ देण्यात आली आहे. हंगामी कामगारांना नोव्हेंबर २०२४ पासून, हंगाम २०२२-२३ मधील कामगारांना २००० रुपये आणि हंगाम २०२३-२४ मधील कामगारांना १५०० रुपये वेतनवाढ देण्यात येत असल्याचे चेअरमन आवताडे यांनी सांगितले.
चेअरमन आवताडे म्हणाले की, कायम कामगारांना जानेवारीपासून, हंगाम २०२२-२३ मध्ये कामावर हजर झालेल्यांना १० टक्के, हंगाम २०२३-२४ मधील कामगारांना ७.५ टक्के व हंगाम २०२४-२५ मधील कामगारांना ५ टक्के वेतनवाढ दिली जाईल. कारखान्याने मागील वर्षी ४,०४,४८४ मे. टन ऊस गाळप करून ३,७९,२०० क्विटल साखर उत्पादित केलेली आहे. चालू हंगामात आजअखेर ६६ दिवसांत २,६६,७४० मे. टन इतके गाळप केले आहे. २,५८,२०० क्विटल साखर उत्पादित केली असून सरासरी साखर उतारा दहा टक्के आहे. यावेळी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, भारत निकम, जनरल मॅनेजर (टेक्निकल) सुहास शिनगारे, मोहन पवार, संभाजी फाळके, बजिरंग जाधव, राहुल नगणे, तोहिद शेख, दामोदर रेवे, अभिजित पवार, चंद्रकांत राठोड, रणजीत पवार आदी उपस्थित होते.