सोलापूर : मोहोळ तालुक्यातील चारही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला असून, चालू हंगामात सात लाख ८१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. कारखान्यांनी सहा लाख ५५ हजार साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. केवळ सरासरी ७३ दिवसच कारखाने चालले. यात सर्वच कारखान्यांच्या सरासरी साखर उताऱ्यात घट झाल्याचे चित्र आहे. तालुक्यात ऊस गाळप व साखर उत्पादनात लक्ष्मीनगर (अनगर) येथील लोकनेते साखर कारखान्याने बाजी मारली आहे. तर सरासरी साखर उताऱ्यात वटवटे येथील जकराया शुगर या साखर कारखान्याने बाजी मारली.
वटवटे (ता. मोहोळ) येथील जकराया शुगर या साखर कारखान्याने कारखान्यातील निघणाऱ्या पेंटवॉशपासून गॅस व सीएनजी गॅसचा प्रकल्प सुरू केला आहे. देशातील हा एकमेव प्रकल्प आहे. दररोज २० टन गॅस उत्पादन क्षमतेचा प्रकल्प असून, आतापर्यंत १२ टन गॅस तयार झाला आहे. रुपयोगी पावडरचे खत तयार करून ते शेतकऱ्यांना विकते जाते. त्यासाठी एका खत कंपनीबरोबर करार झाल्याची माहिती कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी सांगितले. कारखान्याने एक कोटी २० लाख लिटर इथेनॉल निर्मिती केली आहे. त्यातील ४० लाख लिटर इथेनॉल उसाच्या रसापासून तर ८० लाख लिटर हे मोलॅसिसपासून तयार केले आहे.