सोलापूर : आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार आरोप-प्रत्यारोप

सोलापूर : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान माजी आमदार संजयमामा शिंदे आणि मोहिते-पाटील गटाकडून परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या निवडणुकीमागे मोहिते-पाटलांचे मोठे अर्थकारण व राजकारण आहे अशी टीका शिंदे यांनी केली. सभासदांनी डोळसपणे निर्णय घ्या व कारखाना चालू करण्याची क्षमता कोणामध्ये आहे, हे ओळखावे, असे आवाहन त्यांनी केले. तर आदिनाथ कारखाना संजीवनी पॅनेलला मतदान म्हणजे सहकार व मतदारांचा कारखान्यावरील मालकी हक्क टिकवण्यासाठीचे मतदान होय, असे मत आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केले. त्यांनी सभासदांना मतदानाचे आवाहन केले.

आ. शिंदे म्हणाले की, उजनीच्या पाण्यावर चार कारखाने चालतात. मोहिते- पाटलांचा सहकारमहर्षीचा दर हा शिंदे, परिचारकांच्या कारखान्यापेक्षा कायम टनाला ३०० रुपयांनी कमी आहे. यामुळे आज शेतकरी माळशिरस तालुक्यात मोहिते-पाटलांच्या कारखान्याला ऊस पाठवत नाही. त्यासाठी आता त्यांना नवीन बाजारपेठ शोधायची आहे. म्हणून त्यांनी करमाळा तालुक्यातील विद्यमान आमदारांना पुढे करून आदिनाथ ताब्यात घेण्याचे मनसुबे आखले आहेत. या निवडणुकीमागे फार मोठे राजकारण आणि अर्थकारण शिजत आहे. तर आमदार पाटील म्हणाले की, आदिनाथ कारखाना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी सभासदांनी मतदार म्हणून जबाबदारीची भूमिका बजावली पाहिजे. सत्ता दिल्यास आदिनाथ कारखान्यास ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी पारदर्शक व काटकसरीने कारभार करू. वांगी येथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी अरुण अण्णा पाटील होते तर व्यासपीठावर करमाळा नगरपरिषद अध्यक्ष वैभवराजे जगताप, सभापती अतुल पाटील, जयप्रकाश बिले उपस्थित होते. यावेळी बापूराव देशमुख, दादासाहेब पाटील, महेंद्र पाटील, देवानंद बागल, वैभवराजे जगताप आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर वैभव पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here