सोलापूर : राज्य शासनाने बगॅस आधारित सहवीज निर्मिती करणाऱ्या राज्यातील साखर कारखान्यांना प्रती युनिट १ रुपया २५ पैसे एवढे अनुदान दिले आहे. राज्यातील १४ साखर कारखान्यांना गळीत हंगाम २०२३-२४ च्या गळीत हंगामात महावितरणला विक्री केलेल्या विजेवर प्रतियुनिट एक रुपया २५ पैसे प्रमाणे ३१ कोटी ६१ लाख ९ हजार ७०० रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना, लोकमंगल शुगर आणि सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर या कारखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे साखर कारखान्यांन मोठा दिलासा मिळाला आहे.
सहवीज उत्पादनात जिल्ह्यातील या कारखान्यांनी भरारी घेतली आहे. वेणूनगर (ता. पंढरपूर) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने १० मेगावॉट सहवीज निर्मिती प्रकल्पातून ६,७८,२५,००० युनिट वीज निर्मिती केली. कारखान्याने महावितरणला ९८,८८,८३४ युनिट विजेची विक्री केली. ४ रुपये ७५ पैसे या दराने ही विक्री झाली असून कारखान्याला सव्वा रुपये युनिट दराने १,२३,६१,००० रुपये अनुदान मिळाले आहे. तर अकलूज येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याने ७८,५२,२९६ युनिट विजेची निर्मिती केली. त्यापैकी ३२,१७,५५७ युनिट विजेची विक्री केली.
कारखान्याला ४०,२१,९४६ रुपयांचे अनुदान मिळाले आहे. बीबीदारफळ येथील लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को जनरेशन इंडस्ट्रीजने ३,८१,७५,६८३ युनिट विजेची निर्मिती केली. त्यापैकी ८९,०४,१०२ युनिट विजेची विक्री केली. यासाठी १,११,३०,१२८ रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.