सोलापूर : सोलापूर विभागात 32 साखर कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले आहे. त्यामध्ये 16 सहकारी आणि 26 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. विभागाची दैनंदिन गाळप क्षमता 2,15,750 मेट्रिक टन असून 5 जानेवारी अखेर 70.13. लाख टन उसाचे गाळप करून 52.86 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा 7.54 टक्के इतका आहे.
सोलापूर जिल्ह्याचा विचार करता ऊस गाळपात पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे कारखाना आघाडीवर असून या कारखान्याने जवळपास पाच लाख टन गाळप केले आहे. सहकार महर्षी, पांडुरंग कारखान्यांनी साडेतीन लाख टन गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. व्ही.पी शुगर्स तीन लाख टनांच्या उंबरठ्यावर आहे. विठ्ठल (वेणूनगर), बबनरावजी शिंदे यांनी अडीच तर लोकनेते, लोकमंगल (भंडारकवठे), सिद्धनाथ, युटोपियन यांचे गाळप दोन लाखाच्या पुढे गेले आहे. आतापर्यंत निम्म्या क्षेत्रातील ऊसतोड झाली आहे. शेजारील पुणे, सातारा, सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यातील काही कारखान्यांकडून जिल्ह्यातून ऊस गाळपासाठी जात आहे. त्यामुळे जानेवारीअखेर अनेक कारखान्यांचा हंगाम संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जिल्ह्यात यावर्षी १,५०,००० हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र ६०,००० हेक्टरने कमी आहे. एक जानेवारीअखेर ५३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. हेक्टरी सरासरी ७५ टन ऊस उत्पादन गृहीत धरले तर आतापर्यंत कारखान्यांसाठी साधारण ७१ हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस तुटल्याचा अंदाज आहे. सहकारी कारखान्यांची गाळप क्षमता ७४ हजार ३५० तर खाजगी कारखान्यांची ९१ लाख १५० टन आहे. परजिल्ह्यातील कारखान्यांनी किती हेक्टर ऊस गेला याचा अंदाज बांधणे कठीण आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने ऊस गाळपासाठी बहुतांश कारखान्यांची कसोटी लागली आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.