सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे पिंपळनेर युनिट आणि करकंब युनिट या दोन्ही कारखान्यांनी आतापर्यंत १० लाख ५२२ मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. गळीत हंगामामध्ये युनिट नंबर एक व युनिट नंबर दोनकडे १ ते १० जानेवारी या कालावधीत गाळपास आलेल्या पाचव्या १० दिवसाचे उसास प्रतिटन २८०० रुपयांप्रमाणे बिल जमा केले आहे. १ ते १० जानेवारीअखेर प्रतिटन २८०० रुपयांप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले असून ५१ कोटी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
माजी आमदार शिंदे म्हणाले की, दहा दिवसाला व वेळेत पेमेंट देणारा विठ्ठलराव शिंदे जिल्ह्यातील एकमेव कारखाना आहे. या ऊस बिलापोटी साखर कारखान्याने ५१ कोटी ७३ लाख रुपये बँकेत जमा केले आहेत. या गाळप हंगामात आजअखेर साखर कारखान्याने ऊस बिलापोटी २३५ कोटी ३३ लाख रुपये अदा केलेले आहेत. कारखान्याच्या युनिट नंबर एकमध्ये ७,४६,९०० मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. युनिट नंबर दोनमध्ये आजअखेर २,५३,६२२ मेट्रिक टन उसाचे गाळप झालेले आहे. दोन्ही युनिटचे मिळून आजअखेर १०,००,५२२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. यावेळी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक एस. एन. दिग्रजे, जनरल मॅनेजर एस. आर. यादव व इतर अधिकारी उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा: महाराष्ट्र : राज्यात 466.48 लाख क्विंटल साखर उत्पादन, मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 100 लाख क्विंटल उत्पादन कमी
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.