सोलापूर : तडवळ येथील ओंकार साखर कारखान्याने दररोज ६,२०० मे टन ऊस गाळप करत आतापर्यंत ४ लाख मे टन ऊस गाळप केला आहे. कारखान्याने १.७ कोटी युनिट वीज विक्री करत प्रगतीचा नवा टप्पा गाठला आहे. सल्फरमुक्त साखरेचे उत्पादन, २० मेगावॅट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प आणि स्वयंचलित यंत्रसामुग्रीसह अत्याधुनिक व्यवस्था असलल्या कारखान्याने शेतकऱ्यांना व ऊस वाहतुकदार ठेकेदारांना १५ दिवसांत पैसा जमा करत असल्याने कारखान्यास ऊस देण्यास शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांचा जनसंपर्क आणि जनरल मॅनेजर विठ्ठल गायकवाड यांच्या नेतृत्वामुळे कारखाना गतीने गाळप करीत आहे.
ओंकार कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी कामगार, वाहनधारक व कारखान्याच्या कामगारांमध्ये विश्वास संपादन करण्यात यश मिळविले आहे. कारखान्याने शेतकऱ्यांना वेळेवर बिल देण्याची परंपरा कायम ठेवली असून, १५ दिवसात ऊस बिल, तसेच ऊसवाहतूक ठेकेदार यांना बिले दिली जात आहेत. सध्या कारखान्याकडून दररोज अपेक्षेपेक्षाही अधिक ऊस गाळप होत आहे. याच विश्वासामुळे यंदाचा गाळप हंगाम उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण होणार असे जनरल मॅनेजर विठ्ठल गायकवाड यांनी सांगितले. याचबरोबर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीला टनानुसार मोफत साखर वाटप केली. ऊस उत्पादक शेतकरी व ठेकेदार यांचा वाढता विश्वास यामुळेच कारखान्यावर उसाच्या गाड्यांच्या रांगा पहायला मिळत आहेत. तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचा ऊस हा तडवळ येथेच कारखान्याकडे येताना दिसून येत आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.