सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून याचा फटका ऊस क्षेत्राला बसू लागला आहे. विशेषतः बार्शी तालुक्यात पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस क्षेत्रात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील वर्षी कमी पर्जन्यमान झाले. कडक उन्हामुळे जलस्रोतही आटले आहेत. तलावांनी तळ गाठल्याने बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला खोडवा ऊस मोडीत काढला असून, नवीन उसाची लागवडही बंद केली आहे. त्यामुळे यंदा सुमारे ५० ते ६० टक्के उसाचे क्षेत्र घटले आहे.
उस उत्पादकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हा नेहमीप्रमाणेच पुन्हा आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. बार्शी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. दोन खासगी साखर कारखाने आहेत. वेळेवर पाऊस न झाल्यास ऊस उत्पादक शेतकरी इतर पिकांकडे वळण्याची शक्यता आहे. चालू वर्षी उसाची योग्य वेळी नवीन लागवड झाली नाही तर कारखान्यास उसासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.७ जूनपर्यंत जर तालुक्यात पाऊस आला नाही, तर ऊस उत्पादक शेतकरी मूग, उडीद व सोयाबीन पिकाकडे वळू शकतो. त्यामुळे तालुक्यातील उसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.
पाच हजार ७०८ हेक्टर उसाचे क्षेत्र होते. एक लाख ४६ हजार ९३४ हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख ३१ हजार क्षेत्र पेरणी योग्य आहे. त्यामध्ये सोयाबीन, कापूस, ज्वारी ही पिके वगळून शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी उसाचे क्षेत्र ठेवले होते. मात्र, पाणीच नसल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे पाठ फिरविली असून तालुक्यात काही पाण्याच्या पट्ट्यात जेमतेम दोन हजार हेक्टर उसाचे क्षेत्र शिल्लक राहिले आहे.