सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चालू गळीत हंगामात युनिट नंबर एक पिंपळनेरकडे ११ लाख २३ हजार ९९९ मे. टन व युनिट नंबर दोन करकंबकडे ३ लाख ७५ हजार ७३८ मे. टन असे एकूण १४ लाख ९९ हजार ७३७ मे. टन उसाचे गाळप झाले आहे. कारखान्याच्या दोन्ही युनिटतर्फे हंगामाअखेरची संपूर्ण ऊस तोडणी वाहतूक बिले वाहन मालकांना अदा करण्यात आली आहेत. एकूण १२७ कोटी ६८ लाख रुपये ऊस तोडणी, वाहतुकदारांना देण्यात आले आहेत. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बबनराव शिंदे यांनी ही माहिती दिली.
अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले की, साखर कारखान्याने या हंगामात दोन्ही युनिटकडे गाळपास आलेल्या उसाचे बिलासाठी प्रतिटन २८०० रुपयांप्रमाणे हंगामाअखेर ४१९ कोटी ९२ लाख रुपये एवढी रक्कम अदा केलेली आहे. ऊस तोडणी वाहतूकदारांना १५ जानेवारीअखेरची वाहतूक बिले दिली आहेत. १६ जानेवारी ते हंगामाअखेरची ऊस तोडणी वाहतूक बिले तोडणी वाहतूकदारांच्या खात्यात जमा करण्यात आली आहेत. या कालावधीचे ऊस तोडणी, वाहतूक बिलाल ४८ कोटी ८६ लाख रुपये देण्यात आले आहेत.