कोल्हापूर:राज्याच्या साखर उद्योगाकडून सौरऊर्जा निर्मिती व्हावी यासाठी साखर आयुक्तालयाने प्रयत्न सुरू केले आहेत. साखर आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांनी कारखान्यांना सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प सुरू करा, अशा सूचना दिल्या आहेत.राज्य सरकारने २०२५ अखेर २५,००० मेगावॅट क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.त्यानुसार कोल्हापूर विभागातील सांगली जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पाचे काम सुरू केले आहे.राजारामबापू पाटील, सोनहिरा कारखान्यासह अन्य एका कारखान्याने प्रकल्प उभारणीची तयारी सुरू केली आहे.सद्यस्थितीत धाराशिवमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने सौरऊर्जा निर्मितीत यशस्वी पाऊल टाकलेले आहे.
पॅरिस करारानुसार आंतरराष्ट्रीय निश्चित मानकांनुसार ४० टक्के ऊर्जा २०३० पर्यंत अजीवाश्म इंधन स्रोतापासून निर्माण करावयास भारत सरकारने कटिबद्धता दर्शविली आहे.केंद्र शासनाने नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचे महत्त्व विचारात घेऊन ही योजना सुरू केली आहे.या प्रकल्पांचे आयुष्य २५ वर्षे आहे.साखर कारखान्यांना एक मेगावॅटचा प्रकल्प उभारणीसाठी साडेतीन एकर जागा लागणार आहे. त्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.यातून १६ लाख युनिट वीज तयार होऊ शकते.ही वीज सहवीजप्रमाणे महावितरण कंपनीला विक्री करता येणार आहे.यास महाराष्ट्र राज्य उर्जा नियामक आयोगाने मान्यता दिली आहे.
सध्या खर्चिक बगॅस जाळून सहवीज निर्मिती…
साखर कारखान्यांना सध्या खर्चिक बगॅस जाळून सहवीज निर्मिती करावी लागते.नव्या प्रकल्पांना ही वीज प्रती युनिट केवळ ४.७५ रुपये ते ४.९९ रुपये मिळवून देते.त्या तुलनेत सौर वीज २.७० रुपये मिळवून देईल.परंतु त्यास कच्चा माल लागणार नाही.एक मेगावॉट सौरऊर्जा तयार करण्यासाठी साडेतीन ते चार एकर जमीन व चार कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागेल.कारखान्यांना बिगर हंगामातील वीज स्वतः तयार करून सहवीज विकता येईल.त्यामुळे कारखान्यांच्या उत्पन्नात भर पडू शकेल.धाराशिवमध्ये डॉ. आंबेडकर साखर कारखान्याने पाच मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प दहा एकर क्षेत्रात उभा केला आहे.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.