सांगली :ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मजूर टंचाईची मोठी समस्या आहे. मात्र आता मजूर टंचाईने त्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने ऊस लागवडीमुळे श्रम आणि वेळेची बचत होऊ लागली आहे. पारंपरिक पद्धतीने ऊस लागवडीसाठी वेळ, खर्च वाढतो, हे लक्षात घेऊन यंत्राच्या साह्याने ऊस लागवड करणे फायदेशीर ठरते.
यंत्रांच्या साहाय्याने ऊस लागवड करत असताना सरी पाडणे, तीन डोळ्यांचे बेणे तयार करणे, बेणे प्रक्रिया, बेणे सरीत मातीआड करणे, खते पेरून मातीआड करणे ही सर्व कामे एकाचवेळी ट्रॅक्टरच्या एकाच फेरीत पूर्ण होतात. सध्या विविध कंपन्यांची एका ओळीची, दोन ओळींची, तसेच त्याहून जास्त ओळींची यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. अकुशल कामगार देखील थोड्याशा सरावाने हे यंत्र योग्यरीतीने हाताळू शकतो, अशी माहिती कडेगाव (जि. सांगली) येथील उद्यानविद्या महाविद्यालयातील कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. निशान पाटील यांनी सांगितले.
हे यंत्र ट्रॅक्टरला आकारमान आणि वजनानुसार अनुरूप जोडणी करून हे यंत्र वापरता येते. यंत्रावर ऊस हाताळणीसाठी शेतमजुरांना बसण्यासाठी खुर्चीची सोय असते. यंत्राच्या तळाला रिजर आहेत, त्याच्या साहाय्याने सरी पाडली जाते. यंत्राच्यावर, पुढील बाजूस अखंड ऊस ठेवण्यासाठी स्टॅण्ड आहे. ऊस तुकडे करण्यासाठी ब्लेड्स व बेणे प्रक्रियेसाठी ड्रम आहे.
उसाच्या टिपऱ्या मातीआड करण्याची यंत्रणा आहे. यंत्राच्या साह्याने बहुतांशी टिपऱ्या समान लांबीच्या मिळतात. उसाच्या टिपऱ्या होत असतानाच स्वतंत्र पिस्टन पंपाच्या साह्याने त्यावर रासायनिक बेणे प्रक्रिया केली जाते. यंत्रातील रोलरच्या साह्याने टिपऱ्या बाहेर टाकल्या जातात. याचवेळी खतांचा बेसल डोस या यंत्राद्वारे देता येतो. साधारणतः ४५ व त्यापुढील अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरच्या साह्याने यंत्रे वापरता येतात. दोन ओळीच्या यंत्राच्या साह्याने ताशी ०.६ हेक्टर क्षेत्रावर लागवड करता येते. यंत्राच्या साह्याने ऊस लागवड केल्यास, पारंपारिक पद्धतीने ऊस लागवड करण्याच्या तुलनेत ४,००० ते ४,५०० रुपये कमी खर्च येतो.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.