कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मंत्री हसन मुश्रीफ, मी व विनय कोरे यांनी खूप प्रयत्न केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंडळींमुळेच ही निवडणूक लागली, असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. श्री चाळोबादेव शेतकरी आघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या लोकांच्या ओठात एक आणि पोटात एक होते. आमचा सहभाग नाही, असे उत्तर देणाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळेच निवडणूक लागली, अशी टीका त्यांनी केली.
आमदार सतेज पाटील म्हणाले की, आम्ही आजरा कारखान्याला वाऱ्यावर सोडून देणार नाही. केंद्रीय पॅकेजसाठी प्रयत्न करणार आहे. कारखाना निश्चित चालणार आहे. मंत्री मुश्रीफ यांनीही जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. कारखान्याचे गाळप वाढले पाहिजे. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. कारखाना टिकावा हाच प्रत्येकाचा दृष्टिकोन हवा. यावेळी अशोक चराटी, जयवंतराव शिंपी, अंजना रेडेकर, सुनील शिंत्रे, विलास नाईक, उमेश आपटे, अभिषेक शिंपी आदींसह उमेदवार उपस्थित होते.