कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिलेला नसून, केवळ राजकीय आकसापोटी काही लोक अफवा पसरवत आहेत. कारखाना आम्ही पूर्ण क्षमतेने चालविणार असून अफवा पसरवून सभासदांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजू कवडे, कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. पी. एन. पाटील यांनी विश्वासाने आमच्या ताब्यात दिलेला हा कारखाना भाड्याने देणे किंवा विकण्याचा विचारसुद्धा आम्ही करू शकत नाही. कारखान्यात बेकायदेशीरपणे घुसून फोटो व व्हिडीओ काढणाऱ्यांना पायबंद घालणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्ष शिवाजीराव पाटील म्हणाले कि, राजकीय हेवेदाव्यातून काही मंडळी कारखाना कार्यक्षेत्रात अफवा पसरवित आहेत. त्यामुळे सभासद व ऊस उत्पादक शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण होत आहे दरवर्षी बँकेचा १२ ते १३ टक्केप्रमाणे व्याजाचा भुर्दंड बसतो. यावर उपाय म्हणून साधारण ५ टक्के व्याजाने मात्र शासन नियमानुसार व कायदेशीर मागनि अर्थपुरवठ्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यातून दरवर्षी २५ ते ३० टक्के व्याजाची बचत होईल. दरवर्षी कर्ज नूतनीकरणासाठी लागणारी स्टैंप ड्युटी व कागदपत्रासाठी सुमारे ९० लाख ते एक कोटी खर्चात बचत होईल. कर्नाटकातील फायनान्स कंपन्यांबरोबर चर्चा सुरू आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून सात ते आठ वर्षांत कर्जमुक्त करण्यासाठी धडपड सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ संचालक हिंदुराव चौगले, मारुतराव जाधव, डी. आय. पाटील, शिवाजी कारंडे, सुनील खराडे, नीरज डोंगळे, अक्षय पवार- पाटील आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.