पुणे :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम २०२४ – २५ शुक्रवार (दि. १५) पासून सुरू झाला आहे. कारखान्याने करार केलेली जवळपास ७० टक्के ऊस तोडणी यंत्रणा कारखाना कार्यस्थळावर उपलब्ध झाली असून पुढील चार दिवसांत उपलब्ध यंत्रणेवरच पूर्ण क्षमतेने कारखान्याचे गाळप केले जाईल, अशी माहिती सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
कारखाना सभासदांच्या हस्ते गुरुवारी (दि. १४) गव्हाणीत मोळी टाकून कारखाना गाळपास प्रारंभ करण्यात आला. ऊसतोडीसाठी यंत्रणा उपलब्ध झाल्याने शुक्रवारी प्रत्यक्षात कारखान्यावर ऊस गाळपास उपलब्ध झाला. सुरुवातीला सहा हजार प्रतिदिन क्षमतेने गाळप केले जाणार असून यानंतर पुढील चार दिवसांत साडेआठ ते नऊ हजार टनाने ऊस गाळप करण्यात येणार असल्याची माहिती यादव यांनी दिली. सोमेश्वर कारखाना पुढील १५० ते १६० दिवसात १३ लाख मे. टन ऊस गाळप करणार आहे.
दरवर्षी गाळप हंगाम १५ ऑक्टोबरला सुरू होतो मात्र या हंगामासाठी उसाची उपलब्धता कमी असल्याने हंगाम १ नोव्हेंबरला सुरू होईल असा अंदाज होता. मात्र, राज्य सरकारने विविध कारणे देत हंगाम १५ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलला. मात्र, या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. हंगाम उशिरा सुरू झाल्याने एप्रिल, मेपर्यंत हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे. तसेच रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा ही दुबार पिके शेतकऱ्यांना घेता येणार नाहीत. तसेच हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने उसाचे टनेज घटून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
कारखान्याने करार केलेल्या यंत्रणेपैकी १०० बैलगाडी, डंपिंग ट्रक तसेच काही वाहने कमी आली आहेत. विधानसभा निवडणूक असल्याने तसेच मतदान पार पाडल्यानंतर पुढील आठवड्यात उर्वरित यंत्रणा कारखाना कार्यस्थळावर उपलब्ध होईल. यानंतर गाळपाला वेग येणार आहे. सुरुवातीला सभासदांच्या उसाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर जवळच्या अंतरातला गेटकेन ऊस तोडीसाठी आणला जाणार आहे.