पुणे : तब्बल सहा महिन्यानंतर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ च्या गळीत हंगामाची शुक्रवारी समाप्ती झाली. कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप झाल्यानंतर प्रशासनाने हंगाम बंद करण्याचा निर्णय घेतला. कारखान्याने चालू हंगामात उच्चांकी १५ लाख २४ हजार टनाच्या आसपास गाळप केले. हंगाम संपल्यानंतर ऊसतोडणी कामगारांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम एक नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाला होता. कारखान्याचे कार्यक्षेत्र चार तालुक्यात आहे. सभासद, संचालक मंडळ, ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी कामगार यांच्या सहकार्याने गाळप हंगामाची यशस्वी सांगता झाली. सरासरी साखर उतारा, उपपदार्थ व साखरेचे उत्पादन याबाबत अंतिम आकडेवारी हाती येण्यास अजून दोन दिवसांचा कालावधी जाणार आहे. हंगाम समाप्तीचा आनंद कामगारांनी व्यक्त केला. अनेक कामगारांनी आपल्या बैलांना गुलाल लावून कारखाना गेटसमोर फटाक्यांची आतषबाजी केली.