पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत एकरकमी एफआरपी त्वरित अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याची एफआरपी जिल्ह्यात उच्चांकी म्हणजे ३१७० रुपये प्रतिटन आली आहे. कारखान्याने आतापर्यंत २८०० रुपये प्रतिटन इतकी पहिली उचल दिली आहे. आता एफआरपीची उर्वरित ३७३ रुपये प्रतिटनाप्रमाणे होणारी ४५ कोटींची थकबाकी मार्चअखेरीस सभासदांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. या निर्णयानुसार १५ नोव्हेंबर ते १५ मार्चपर्यंत गळीत झालेल्या उसापोटी हे जादाचे पैसे मिळणार आहेत.
याबाबत, कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या आदेशानुसार चालू हंगामाचा उतारा १२.०५ टक्के व तोडणी वाहतूक खर्च गृहित धरून ३१९० ते ३१२५ रुपयांच्या आसपास एकूण एफआरपी होत आहे, तर केंद्र सरकारच्या आदेशानुसार गतहंगामाचा उतारा १२.२१ टक्के व तोडणी वाहतूक खर्च ८७८ रुपये प्रतिटन गृहीत धरून ३१७३ रुपये एकूण एफआरपी होत आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत प्रतिटन ३१७३ रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. यामुळे कर्जफेड, शेतभांडवल, शिक्षण यासाठी शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
—