पुणे : सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांचा आडसाली ऊस १९ ते २१ महिने तोड नसल्याने शेतामध्येच उभा आहे. अध्यक्ष, संचालक मंडळ व कार्यकारी संचालकांच्या चुकीच्या धोरणामुळे तसेच शेती विभागाच्या कोलमडलेल्या नियोजनामुळे सभासदांचे तिहेरी नुकसान झाले आहे. वेळेवर ऊसतोड न झाल्याने सभासदांचे एकरी १० ते १५ मेट्रिक टनापर्यंत उसाचे वजन घटलेले आहे. त्यामुळे एक फेब्रुवारीनंतर गाळप केलेल्या ऊसाला कारखान्याने सरसकट ३५० रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी केली आहे.
काकडे यांनी सांगितले की, कारखान्याने गेटकेन ऊस तत्काळ बंद करून सभासदांची ऊसतोड व्हावी, यासाठी कृती समितीने मागण्यांसह निवेदन देऊन ३ फेब्रुवारी रोजी मोर्चाही काढला. मात्र तरीही अध्यक्षांनी ऊसतोड बंद केली नाही. कृती समितीला चर्चेला निमंत्रण दिले नाही. निवेदनाचे उत्तरही दिले नाही. सभासदांच्या एकरी उसाचे उत्पादन किमान १० टनाने वाढले आहे. मात्र, कारखान्याने गेटकेन उसाला समान ऊस दर देऊन त्यांना तोडी दिल्या, त्यामुळे सभासदांचा ऊस तोडणी विना आहे. जे सभासद ऊस जळीत करून आणत आहेत, त्यांच्याकडून प्रती टन ५० रुपये कपात होत आहे. या नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल काकडे यांनी उपस्थित केला.