सोमेश्वर कारखान्याने ३,५५० रुपये दर द्यावा : सतीश काकडे यांची मागणी

पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याने ३३५० रुपये अंतिम दर जाहीर केला, मात्र उपपदार्थाचे मूल्यांकन घटवून व ठेव विमोचन निधी निर्माण करून सभासदांना जाणीवपूर्वक प्रतिटन दोनशे रुपये दर कमी केला आहे. कारखान्याने ठेव विमोचन निधी ऊसदरासाठी खर्चा टाकावा आणि प्रतिटन ३५५० रुपये इतका अंतिम भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी केली आहे.

‘सोमेश्वर’ कारखान्याने २०२२-२३ हंगामात परिसरातील कारखान्यांपेक्षा जादा गाळप, जादा उतारा, उपपदार्थनिर्मिती केली आहे. निर्यात केलेल्या साखरेस चार हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून सरासरी साखर विक्री ३,३२५ रुपये प्रतिक्विंटलने झाली आहे. सहवीजनिर्मिती व डिस्टलरीतून पन्नास कोटीचा नफा झाल्याचा दावा काकडे यांनी केला आहे. मात्र, कारखान्याने उपपदार्थाचे मूल्यांकन कमी करून व ठेव विमोचन निधी निर्माण करून दोनशे रुपये भावात कमी केले आहेत, असा आरोप काकडे यांनी केला आहे. काकडे यांनी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना दर वाढवून देण्याची मागणी केली आहे. काकडे म्हणाले, राज्यात अनेक कारखाने प्रति टन ३२०० ते ३३०० रुपये दर देत आहेत. ‘सोमेश्वर’च्या संचालक मंडळाने ज्याला व्याज मिळत नाही, असा पंधरा कोटी रुपये ठेव विमोचन निधी उभारून सभासदांवर अन्याय केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here