पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने नुकतेच १५ लाख एक हजार टन गाळप करत १७ लाख ९५ हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे. साखर उताऱ्यात कारखान्याने बाजी मारली आहे. ११.९८ टक्के साखर उतारा राखत पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने बंद झाल्यानंतर सोमेश्वरचा हंगाम अजूनही आठवडाभर चालण्याची शक्यता आहे. कारखाना प्रशासनाकडून तातडीने या भागातील ऊस गाळपास आणला जात आहे. वाढलेल्या उन्हामुळे ऊस तोडणी मजूर पहाटेच ऊसतोड करीत आहेत.
गेल्याच आठवड्यात माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम बंद झाला. त्यापाठोपाठ सोमेश्वरचाही हंगाम बंद होणार आहे. २५ एप्रिलपर्यंत हंगामाची सांगता होणार आहे. दरम्यान, सोमेश्वर कारखान्याकडे १५ मार्चपर्यंत २७ हजार ५०७ एकर उसाची नोंद झाली आहे. पुढील हंगामात कारखान्याकडे ८ लाख टन ऊस उपलब्ध होईल. ४ ते ५ लाख टन ऊस गेटकेनचा आणावा लागेल. कार्यक्षेत्रात केवळ ६० टक्के ऊस लागवड झाली आहे. गेल्या वर्षी ४२ हजार एकराची नोंद होती. चालू वर्षी २७ हजार एकराची नोंद झाली आहे. कारखान्याला गेटकेन ऊस आणण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.