पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा लागण हंगाम १५ जूनऐवजी १ जुलै रोजी लागण हंगाम सुरू करण्यात येणार आहे. सभासदांनी मंजुरी दिली तरच गेटकेन ऊस गाळपासाठी आणला जाईल. मात्र, गाळप हंगाम १५० ते १६० दिवस चालला तरच कारखान्याला फायदा होईल, असे प्रतिपादन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले. कारखान्याच्यावतीने हंगाम २०२४- २५ व गाळप हंगाम लागण तोडणी संदर्भात कारखाना कार्यस्थळावर चर्चासत्र झाले. त्यावेळी सभासदांनी चर्चेत सहभाग घेत उसासंदर्भातील अडचणी मांडल्या. दरम्यान, २०२४- २५ साठी सभासद शेतकऱ्यांनी लागण करताना आडसाली ४० टक्के, सुरु व पूर्व हंगामी २५ टक्के आणि खोडवा ३५ टक्के असे नियोजन करण्यात आले आहे, जगताप यांनी सांगितले.
पुढारीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अध्यक्ष जगताप यांनी सांगितले की, नुकत्याच संपलेल्या हंगामात आडसाली उसाचे क्षेत्र सर्वाधिक होते. त्यामुळे आडसाली उसाबरोबर पूर्व हंगामी, सुरु आणि खोडवा उसाला न्याय दिला. जिरायती भागातील साडेपाच लाख टन ऊस गाळपास आला. एकरी उत्पादन वाढीने हंगाम लांबला. गेल्या हंगामात जवळचा आणि ९० टक्के चांगल्या रिकव्हरी असलेला ऊस गाळपास आला होता. यावेळी अनेक सभासदांनी गेटकेन ऊस तोडण्यास आणू नये, असे स्पष्ट मत व्यक्त केले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी आगामी हंगामासाठी कारखान्याकडे ३१ हजार एकराची नोंद झाल्याची माहिती देत गेटकेन आणणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. चर्चेत शिवाजी शेंडकर, ऋतुराज काकडे, धनंजय हाके, विजय काकडे, मदन काकडे, संजय घाडगे, विठ्ठल पिसाळ, भाऊसाहेब भोसले, महेश जेधे, सुरेश जेधे, राहुल चव्हाण, मदन काकडे,. योगेश भोसले, बळीआप्पा यादव आदींनी सहभाग घेता.